जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांच्या कारवाईचा धाक उरलाय कुठे? ; शिरोळ पोलिसांच्या हद्दीत मटका,तीनपानी जुगार, बेकायदेशीर दारू,सुगंधी सुपारीची अवैध वाहतूक धंदे जोमात
शिरोळ | प्रतिनिधी
शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, तीनपानी जुगार, बेकायदेशीर देशी दारू, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी सुपारीची विक्री आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक असे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांची असताना प्रत्यक्षात प्रभावी कारवाई होत आहे का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिरोळ शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये अवैध व्यवसायांनी ठाण मांडल्याची चर्चा आहे. मटका आणि तीनपानी जुगारामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. बेकायदेशीर दारू विक्री आणि प्रतिबंधित उत्पादनांच्या वाहतुकीमुळे सामाजिक आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असे असतानाही या व्यवसायांवर सातत्याने कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
अवैध व्यावसायिकांना कोणाचे अभय?
पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक मुसा सुतार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.संबंधित अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय अवैध व्यवसाय सुरू ठेवणे शक्य नाही,अशा स्वरूपाचे आरोप आणि चर्चा परिसरातील महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.मात्र, या तक्रार देण्यास गेल्यावर तक्रारदारावरच चौकशीचा ससेमेरा लागत असल्याचा जुना अनुभव असल्याने आता महिला व सर्वसामान्य नागरिक तक्रार देण्यास शिरोळ पोलीस ठाण्यास जात नाहीत त्यामुळे या अवैद्य व्यवसायिकांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडून निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे.
अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल ही उपस्थित होत असून, काही ठिकाणी खुलेआम वाहतूक आणि विक्री सुरू असल्याच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.संबंधित प्रकारांवर कारवाई होत नसेल, तर त्यामागील कारणे शोधून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल लक्ष घालणार का?
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी सुपारीची वाहतूक, बेकायदेशीर देशी दारूची विक्री, जुगार आणि अवैध प्रवासी वाहतुकीबाबतच्या तक्रारींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.केवळ अधूनमधून कारवाई करून प्रश्न सुटणार नाही;अवैध व्यवसायांचे जाळे शोधून त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवायांचा आढावा घ्यावा. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलिसांचा धाक गुन्हेगारांना असायला हवा, सर्वसामान्य नागरिकांना नव्हे! शिरोळमधील कथित अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे, हेच आता कोल्हापूर जिल्हा पोलिसांसमोरील खरे आव्हान आहे. जिल्हा पोलीस प्रमुख या अवैध व्यवसाय कांवर काय भूमिका घेतात, याकडे शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.