शिरोळमध्ये नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने गौरव!, रोटरी क्लब ऑफ शिरोळ आणि डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

Spread the love

शिरोळमध्ये नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने गौरव!

रोटरी क्लब ऑफ शिरोळ आणि डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; ‘महिला दांडिया २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी

समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत सामाजिक कार्य, नेतृत्व आणि सेवाभावातून इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ शिरोळ आणि डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला दांडिया २०२६’ या कार्यक्रमात हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

शिरोळ येथील टारे क्लब हाऊस येथे गुरुवारी मंगलमय आणि उत्साही वातावरणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला महिलांच्या कर्तृत्वाच्या गौरवाची जोड देणाऱ्या या सोहळ्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.दांडियाच्या उत्साहाबरोबरच समाजासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

या वेळी शिरोळच्या नगराध्यक्षा योगिता सतीश कांबळे, कल्पना प्रवीण माळी, जयश्री जगदीश पाटील, मनिषा नितीन कुंभार, पौर्णिमा महेश चुडमुंगे, अश्विनी चंद्रसेन इंगवले, अनुराधा संतोष माने, प्रज्ञा श्रीकांत माळकर आणि लता मदन माने या नऊ महिलांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या महिलांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्यातून समाजातील अन्य महिलांनाही प्रेरणा मिळावी, हा पुरस्कारामागील उद्देश असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

महिला या केवळ कुटुंबाचा आधार नसून सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या कार्यातून त्या समाजाला दिशा देतात, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतात आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करतात. अशा महिलांच्या कार्याची सार्वजनिक स्तरावर दखल घेतल्याने त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन मिळते. ‘नवदुर्गा पुरस्कार’ सोहळ्याच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे-यड्रावकर, अविनाश टारे, पंडित काळे, डॉ. अंगराज माने, मोहनराव माने, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. दिनेश माने-गावडे, नितीन शेट्टी, सचिन देशमुख, संदीप बावचे, शिवराज महात्मे, बाळासो शेट्टी, अतुल टारे, प्रताप देसाई, सुनील बागडी, विजय माळी, अमित पंडित, बापूसो गंगधर यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व महिला उपस्थित होत्या.

महिलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला दांडिया २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक आनंदासोबतच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा सोहळा शिरोळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लक्षवेधी उपक्रम ठरला.

Leave a Comment

error: Content is protected !!