यड्रावकरांच्या सांगण्यावरून बेकायदेशीर कार्यालय बांधल्याचा डॉ.मुबीन मुल्लांचा दावा ‘सार्वजनिक बांधकाम’मधील अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा!

Spread the love

यड्रावकरांच्या सांगण्यावरून बेकायदेशीर कार्यालय बांधल्याचा डॉ.मुबीन मुल्लांचा दावा ‘सार्वजनिक बांधकाम’मधील अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा! शिरोळ तालुक्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; 

शिरोळ | प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप डॉ. मुबीन शौकत मुल्ला (आष्टेकर) यांनी केला आहे. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीर कार्यालय बांधण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. जयसिंगपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

डॉ. मुल्ला म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. पदाचा आणि अधिकारांचा वापर करताना नियमांचे पालन करणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या कथित गैरकारभारामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदेशीर बांधकाम आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 ‘चळवळीच्या तालुक्यात मनमानी खपवून घेणार नाही’

शिरोळ तालुका हा अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आणि जनआंदोलनांची परंपरा असलेला तालुका आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. नियमबाह्य कामे केल्यास त्याचे परिणाम संबंधित अधिकाऱ्यांनाच भोगावे लागतील, असा इशाराही डॉ. मुल्ला यांनी दिला.

चौकशी करून कारवाईची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांचा दर्जा, निधीचा विनियोग, कार्यालय बांधकामाची वैधता आणि संबंधित प्रशासकीय मंजुरी यांची निष्पक्ष चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोपांची सत्यता तपासून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. आरोपांची स्वतंत्र पडताळणी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!