टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवा : डॉ. राधाकिशन पवार, सर्व संशयितांची एक्स-रे तपासणी, ट्रूनॅट तपासणीत वाढ करण्याच्या सूचना

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी : कुबेर हंकारे

क्षयरोगाचे (टीबी) वेळेत निदान करून रुग्णांना तातडीने उपचाराच्या प्रवाहात आणण्यासाठी सध्या सुरू असलेले टीबी मुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, तसेच टीबी संशयितांची एक्स-रे तपासणी, ट्रूनॅट व मायक्रोस्कोपी तपासणीचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिल्या.

डॉ. पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, पुलाची शिरोली येथे भेट देऊन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध आरोग्यविषयक इंडिकेटर्सची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी विभाग, ट्रूनॅट लॅब व औषधोपचार विभागाला प्रत्यक्ष भेट देत कामकाजाची पडताळणी केली.

यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी केंद्रस्तरीय निकषांनुसार अधिकाधिक गावे टीबीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. नॅट तपासणी, डीबीटी, आभा प्रमाणीकरण यांसह विविध इंडिकेटर्स वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. टीबी रुग्णांना उपचारादरम्यान सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील संस्था व डॉक्टरांचा क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातील सहभाग वाढवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुष्ठरोग निर्मूलनाबाबतही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर उपचाराखाली आणावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कामकाजाची सविस्तर पडताळणी केल्यानंतर डॉ. पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्षयरोग व कुष्ठरोग कार्यक्रमाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते एका क्षयरुग्णाला पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्रूस, डीटीसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल जाधव यांच्यासह तालुका क्षयरोग पर्यवेक्षक, जिल्हा व तालुका आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी,प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथील कर्मचारी, एनएमपी प्लस संस्थेचे कर्मचारी, आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Leave a Comment

error: Content is protected !!