पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
आषाढी एकादशीचे औचित्य साधत ज्ञानदीप विद्यालय, शिरोली येथे बालवारकऱ्यांची दिंडी आणि गोल रिंगण मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा जयघोषात दिंडी काढली.
यावेळी विद्यार्थ्यांनी संतांच्या अभंगांचे गायन करत विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणुकीत सहभागी करून घेतली. दिंडीनंतर पारंपरिक पद्धतीने गोल रिंगणाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने फुगड्या, अभंग आणि हरिनामाच्या गजरात सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचा अनुभव घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदायाची संस्कृती तसेच एकात्मता, शिस्त आणि भक्ती यांचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून देण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव आणि भारतीय परंपरेबद्दल आदर निर्माण होतो, असे सांगितले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण स्वरूपात संपन्न झाला. या उपक्रमात कृष्णात पाटील , अरुणा कोठावळे, राजश्री पाटील, मीरा सावंत, श्वेता झांबरे, शालेय पोषण विभागाच्या सौ. बुरुड व सौ. हिरवे यांच्या सह शाळाव्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक उत्साहाने सहभागी झाले होते