नृसिंहवाडी दत्त मंदिरात पुराच्या पाण्याचा शिरकाव; कृष्णा-पंचगंगेची पातळी सुमारे चार फूटाने वाढ
नृसिंहवाडी | प्रतिनिधी
कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सोमवारी दिवसभर वाढ होत राहिल्याने अखेर पुराच्या पाण्याने श्री दत्त मंदिरात प्रवेश केला.दिवसभर काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली असली, तरी अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे नदीची पातळी वाढत राहिली.सोमवारी दिवसभरात पाणीपातळीत सुमारे चार फूट वाढ नोंदविण्यात आली.आज सकाळी दत्त मंदिरासमोरील सभामंडपापर्यंत आलेले पुराचे पाणी सायंकाळपर्यंत मंदिराच्या मुख्य उंबऱ्यापर्यंत पोहोचले. रात्री उशिरापर्यंत पाणी मंदिरात शिरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन मंदिरातील सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.दरम्यान, नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ सुरूच असून हीच स्थिती कायम राहिल्यास मंगळवारी पहाटेपर्यंत दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे पहिल्या दक्षिण द्वार सोहळ्यासाठी भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.सोमवारी सायंकाळी नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ३७ फूट ६ इंच इतकी नोंदविण्यात आली. तर राजापूर बंधाऱ्यावरून कर्नाटकच्या दिशेने ६७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रातील वाढत्या पाणीपातळीवर प्रशासनाचे लक्ष असून नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.