हिप्परगी बॅरेजची सर्व गेट तातडीने उघडा; अन्यथा पूरस्थितीला पाटबंधारे विभाग जबाबदार! आंदोलन अंकुश संघटनेची सांगली पाटबंधारे विभागाकडे आक्रमक मागणी; कर्नाटक सरकारशी तातडीने समन्वय साधण्याचे निवेदन
सांगली / प्रतिनिधी
कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजची सर्व गेट तात्काळ उघडण्यासाठी कर्नाटक सरकारशी तातडीने समन्वय साधावा, अन्यथा संभाव्य पूरस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहील, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करून त्वरित कारवाईची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, नियमानुसार १ जूनपूर्वी हिप्परगी बॅरेजची सर्व गेट उचलली जातात. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून कृष्णा आणि पंचगंगा खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी आणि नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी हिप्परगी बॅरेजची सर्व गेट आजच्या आज उघडण्याबाबत कर्नाटक पाटबंधारे विभागाला तातडीने पत्र पाठवावे, तसेच आवश्यक असल्यास मंत्रीस्तरावर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास किंवा दिरंगाईमुळे पूरस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, संघटनेच्या मागणीनंतर सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक पाटबंधारे खात्याशी संपर्क साधत आवश्यक पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.