शिरोळ / प्रतिनिधी
रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियन्ट इंग्लिश मिडीयम स्कूलचा २२ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमात बोलताना स्कूलच्या संचालिका ॲड.तृप्ती मोहन माने यांनी सांगितले की, संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या शाळेने आज ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सक्षम केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य संस्थेमार्फत सातत्याने सुरू असून त्याबद्दल सर्व स्तरांतून संस्थेचे कौतुक होत आहे.
संचालिका डॉ. पूजा मोहन माने यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर संस्कार, शिस्त, सर्जनशीलता, जीवनकौशल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचेही शिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. भविष्यात जबाबदार, संवेदनशील आणि सक्षम नागरिक घडविण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
संचालिका स्वाती माने यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील बदलत्या जगासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने मल्टिस्किल शिक्षण, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशीलता आणि संशोधनाची वृत्ती विकसित करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या स्थापनेपासूनचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांच्या तोडीस तोड दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने अनेक अडचणींवर मात करत शाळेची उभारणी करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील सातत्य, परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर आज शाळेने भक्कम वटवृक्षाचे रूप धारण केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
यावेळी विविध शालेय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा तसेच विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास स्कूलचे प्राचार्य पी. एस. काकडे, पर्यवेक्षक शहनाज शेख, मानसी पाटील, ज्योती बरगाले, गजानन भोसले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रेरणा देणारा आणि आधुनिक शिक्षणाची दिशा अधोरेखित करणारा हा वर्धापन दिन सोहळा संस्मरणीय ठरला.