पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील महाडिक पेट्रोल पंपसमोर आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. या अपघातात एक ट्रक आणि टाटा सफारी कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाडिक पेट्रोल पंपसमोर हायवेच्या मध्यभागी सिमेंटचे मोठे दुभाजक (डिव्हायडर) लावून दोन्ही बाजूंची वाहतूक वळवण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ च्या सुमारास पुणे बाजूकडून बंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक थेट रस्त्यावरील मोठ्या सिमेंटच्या डिव्हायडरला जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, तो जड डिव्हायडर सरकून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन पडला त्याच वेळी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी एक टाटा सफारी कार तिथून जात असताना रस्त्यावर अचानक आलेल्या डिव्हायडरवर कार आदळून त्यावर जाऊन अडकली. या विचित्र अपघातात ट्रक आणि सफारी कार या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे हायवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आणि काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील वाहने रस्त्यावरील डिव्हायडर बाजूला करून वाहतूक पुन्हा पूर्ववत व सुरळीत केली.