शिरोळ / प्रतिनिधी
चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन तथा श्री गणेश बेकरी नांदणी प्रा.लि.चे प्रमुख उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, नवी दिल्ली या देशातील बेकरी उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेच्या ‘सिनियर व्हाईस प्रेसिडेंट’ या पदावर सलग नवव्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे १३ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या संस्थेच्या ४० व्या वार्षिक संमेलनात ही निवड सर्वानुमते करण्यात आली.भारतीय बेकरी उद्योगाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या आण्णासाहेब चकोते यांच्या नेतृत्वावर देशभरातील सदस्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या या सलग नवव्या निवडीमुळे महाराष्ट्रासह स्थानिक उद्योग क्षेत्रात आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.या वार्षिक संमेलनात परफेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एच.के.बत्रा यांची ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. देशभरातील विविध राज्यांमधील बेकरी उद्योगाशी संबंधित उद्योजक, तज्ज्ञ आणि सदस्य मोठ्या संख्येने या संमेलनासाठी उपस्थित होते.चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख म्हणून आण्णासाहेब चकोते यांनी बेकरी उद्योगात उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश बेकरी नांदणी प्रा.लि.ने गुणवत्ता, विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.ग्रामीण भागातून उद्योग उभारून त्यांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनीने सातत्याने प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे.उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आण्णासाहेब चकोते यांचे योगदान उल्लेखनीय आहे.विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक मदत, तसेच समाजोपयोगी कार्यांमधून त्यांनी समाजाशी घट्ट नाते जोडले आहे. याच कार्याची दखल घेत या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनात त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.या संमेलनात श्री गणेश बेकरी नांदणी प्रा. लि.च्या वतीने कंपनीचे सेल्स कॉर्पोरेट हेड ऋतुजा चकोते आणि कॉर्पोरेट हेड अभिषेक चकोते यांनी प्रतिनिधित्व केले. नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून ते बेकरी व्यवसाय पुढे नेण्याचे कार्य करत आहेत.अल्पावधीतच त्यांनी आपल्या चिकित्सक वृत्ती, आधुनिक दृष्टिकोन आणि सखोल अभ्यासामुळे उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.नवीन तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनांची गुणवत्ता, बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची निर्मिती यामुळे गणेश बेकरीने उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.युवा नेतृत्वामुळे कंपनीच्या विस्ताराला नवे आयाम मिळत असल्याचे मतही अनेक उद्योजकांनी यावेळी व्यक्त केले.संमेलनामध्ये भारतीय बेकरी उद्योगाच्या वाढीसाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले.जागतिक बाजारपेठेतील वाढती स्पर्धा,बदलते तंत्रज्ञान,उत्पादन प्रक्रियेतील नवकल्पना, शासनाचे विविध नियम व धोरणे, तसेच भारतीय ग्राहकांमध्ये बेकरी उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.याशिवाय आखाती प्रदेशातील युद्धपरिस्थितीचा उद्योगावर होणारा संभाव्य परिणाम,कच्च्या मालाच्या किंमतीतील चढ-उतार, तसेच जागतिक व्यापारातील बदल यांचा उद्योगावर होणारा परिणाम यावरही चर्चा झाली. उद्योग अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय बेकरी उद्योगातील बहुमोल योगदानाबद्दल स्वर्गीय राम अवतार गुप्ता यांना मरणोत्तर ‘लाईफ टाइम अवॉर्ड 2025-26’ प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार त्यांच्या सुपुत्रांनी, आशा राम अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक शिवकुमार गुप्ता यांनी परिवारासह स्वीकारला.त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनिक बायोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक गिरीश मतलानी उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून भारत सरकारच्या वजन मापन,ग्राहक,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे संचालक आशुतोष अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी अन्न उद्योगातील गुणवत्ता नियंत्रण,ग्राहकांचा विश्वास आणि शासकीय नियमांचे पालन याचे महत्त्व अधोरेखित केले.या प्रसंगी ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मागो (किट्टी ब्रेड), नवनिर्वाचित अध्यक्ष एच. के. बत्रा (परफेक्ट ब्रेड), उपाध्यक्ष अरविंद सिंघल (ब्रिटानिया इंडस्ट्रीज), शिवकुमार गुप्ता (आशा राम अँड सन्स), खजिनदार संदीप आहुजा (मिल्कमेड) यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. देशभरातील बेकरी उद्योगातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे हे संमेलन उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरले.उद्योगाच्या प्रगतीसाठी सहकार्य, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि गुणवत्तेवर भर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची सलग नवव्यांदा झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा लाभ भारतीय बेकरी उद्योगाला पुढील काळातही मिळेल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.