जयसिंगपूर / प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत जयसिंगपूरचे सुपुत्र ऋषीकेश राजेंद्र आलासे यांनी देशात ६१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशामुळे जयसिंगपूरसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून सत्कार केला.यावेळी गणपतराव पाटील म्हणाले, “ऋषीकेश आलासे यांनी घेतलेला ध्यास, त्यासाठी केलेले परिश्रम आणि अपार चिकाटी यामुळेच त्यांनी हे यश संपादन केले आहे.स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सातत्य,अभ्यास आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. ऋषीकेश यांनी या सर्व गुणांच्या जोरावर केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर जयसिंगपूर शहराचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऋषीकेश आलासे यांचे यश प्रेरणादायी आहे.त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.ऋषीकेश आलासे यांनी यूपीएससीसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात ६१ वा क्रमांक मिळवून प्रशासकीय सेवेकडे भक्कम पाऊल टाकले आहे.त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह शिक्षक,मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.यावेळी गणपतराव पाटील यांनी ऋषीकेश आलासे यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत,देशसेवेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.या प्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी ऋषीकेश आलासे यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.