निमशिरगाव / प्रतिनिधी
निमशिरगावमध्ये दूषित व अळीयुक्त पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर प्रशासनाला जाग आली असून शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी गावाला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.नागरिकांच्या तीव्र संतापानंतर आणि माध्यमांतून वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावात धाव घेत ग्रामपंचायत प्रशासनाला कडक शब्दांत जाब विचारला.गावातील अनेक भागांमध्ये गटारीमिश्रित व अळीयुक्त पाणी नळांमधून येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला खडे बोल सुनावत दूषित पाणी येत असलेल्या भागांतील पाईपलाईनमधील लिकेज तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी ही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.पूर्वी जलस्वराज्य योजनेअंतर्गत नदीतून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या शासनाकडून जलजीवन मिशन मंजूर झाले असले तरी निधीअभावी काम रखडले आहे.जुन्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दोन योजना अस्तित्वात असूनही गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. या समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासनही परीट यांनी दिले.याचबरोबर गावात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली केवळ चार टक्के झाल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा कारभार अत्यंत गलथान असल्याचा आरोप करत पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. गटविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर तरी पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.यावेळी सरपंच अश्विनी गुरव,सदस्य नंदकुमार कुंभार,पोलीस पाटील संदीप साजणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील,राजू मगदूम, अविनाश कडोले, अशोक ठोमके, राजगोंडा पाटील,दिलीप पाटील, आरिफ बागसार,अविनाश धनवडे तसेच स्वाभिमानी महिला आघाडीच्या रेवती पाटील, सुंदर पाटील, सुवर्णा पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.