शिरोळ / प्रतिनिधी
मराठी रंगभूमीवर एकपात्री प्रयोगांची परंपरा जपणाऱ्या कलाकारांमध्ये शिरोळ येथील प्रसिद्ध नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते.गेल्या तीन दशकांहून अधिक काळ एकपात्री नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना खळखळून हसवले, विचार करायला भाग पाडले आणि लोकजीवनातील विविध पैलू रंगमंचावर जिवंत केले.आता त्यांच्या नव्या एकपात्री लोकनाट्य प्रयोगाचा, ‘हालगी’चा, शुभारंभ रविवारी १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे.या प्रयोगाची उत्सुकता नाट्यरसिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.कलाविश्व रंगभूमी आणि आधार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र दाभाडे आणि डॉ.दगडू माने यांनी सांगली परिसरातील कला रसिकांना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकपात्री नाट्यकलेचा आनंद घ्यावा,असे आवाहन केले आहे.सांगलीची रंगभूमी ही ऐतिहासिक परंपरा लाभलेली असल्याने ‘नाट्यपंढरी’ म्हणून ओळखली जाते.अशा या समृद्ध नाट्यभूमीवर ‘हालगी’चा पहिला प्रयोग रंगणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राजेंद्र प्रधान हे एकपात्री नाट्यप्रयोगांच्या क्षेत्रातील अत्यंत मेहनती आणि प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभिनयातील सहजता, ग्रामीण जीवनाचा अचूक अभ्यास आणि विनोदी शैलीतील नेमकेपणा ही त्यांच्या सादरीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी यापूर्वी सादर केलेले ‘नमस्कार मी कैलासवासी’ आणि ‘खैंदूळ’ हे एकपात्री प्रयोग प्रचंड लोकप्रिय झाले होते. विशेष म्हणजे ‘खैंदूळ’ या प्रयोगाचे सलग ३६ तासांत १२ प्रयोग सादर करून त्यांनी एक वेगळाच विश्वविक्रम नोंदवला होता. या विक्रमामुळे त्यांची कला आणि जिद्द याची दखल राज्यभरातील नाट्यप्रेमींनी घेतली.आता ‘हालगी’ या नव्या एकपात्री लोकनाट्यातून राजेंद्र प्रधान पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर नव्या रंगतदार शैलीत उभे राहत आहेत.‘हालगी’ हा प्रयोग विनोदी,राजकीय आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणारा आहे.ग्रामीण बोली भाषेतील गंमती,राजकारणातील घडामोडींवर हलक्या-फुलक्या शैलीत केलेले भाष्य आणि सामान्य माणसाच्या मनातील भावना यांचा सुरेख संगम या प्रयोगात पाहायला मिळणार आहे.या प्रयोगात समाजातील विसंगती, राजकीय परिस्थितीतील चढउतार आणि ग्रामीण भागातील लोकजीवन यांचे चित्रण विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने केले गेले आहे. राजकारणातील बदलत्या घडामोडींवर हलक्या फुलक्या विनोदातून भाष्य करताना कलाकार समाजातील वास्तवही प्रभावीपणे मांडतो.त्यामुळे प्रेक्षकांना केवळ हास्याचा आनंदच मिळत नाही, तर त्यामधून सामाजिक जाणिवा अधिक स्पष्टपणे समोर येतात.राजेंद्र प्रधान यांच्या सादरीकरणाची खासियत म्हणजे त्यांची टिपिकल, पॉलिटिकल आणि धमाल विनोदी शैली.एकाच कलाकाराने विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, बोलण्याची ढब आणि सामाजिक संदर्भ जिवंत करणे हे एकपात्री प्रयोगाचे मोठे आव्हान असते.मात्र प्रधान आपल्या सहज अभिनय,आवाजातील विविधता आणि विनोदी टायमिंगमुळे हे आव्हान प्रभावीपणे पेलतात.त्यामुळे त्यांच्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे.कलाविश्व रंगभूमी आणि आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘आदर्श समाज सेवारत्न’ पुरस्कार कैस शेख (मिरज), सुरेखा कांबळे (सांगली), आदर्श उपाध्ये (लातूर), शिवाजी एडवान (माणकापूर), रमेशकुमार मिठारे (अकिवाट), नगराध्यक्ष दिगंबर कांबळे (बोरगाव) आणि राहुलदेव पोवार (यड्राव) यांना प्रदान करण्यात येणार आहेत.याचबरोबर ‘लोकजागृती कलारत्न’ पुरस्कार रोहित शिंदे (मिरज) यांना तर ‘आदर्श माता’ पुरस्कार सुगंधा माने (शिरोळ) यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.
कार्यक्रमाविषयी माहिती देताना संयोजक राजेंद्र दाभाडे म्हणाले की,शिरोळसारख्या ग्रामीण भागातून अनेक गुणी कलाकार घडले आहेत आणि त्यांनी आपल्या कलेच्या बळावर मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजेंद्र प्रधान यांच्यासारखे कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर नाट्यकलेची परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत.अशा कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे.ते पुढे म्हणाले की, कलाकाराला प्रेक्षकांची साथ, प्रोत्साहन आणि दाद हीच खरी ऊर्जा देणारी असते. त्यामुळे कला रसिकांनी या एकपात्री प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी अशा प्रयोगांना प्रेक्षकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे.सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या ‘हालगी’च्या शुभारंभ प्रयोगाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विनोद,व्यंग आणि सामाजिक जाणिवांचा संगम असलेला हा प्रयोग नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळा नाट्यअनुभव देईल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.