पाणीपुरवठा योजनेवरून अब्दुल लाटमध्ये संताप; १६ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

Spread the love

अब्दुल लाट / प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अब्दुल लाट येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.याच पार्श्वभूमीवर सोमवार, १६ मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय कॉम्रेड आप्पा पाटील यांनी जाहीर केला आहे.गावातील सुजान व जागरूक नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासावर आणि पाठबळावर आपण या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी व कामातील दिरंगाईबाबत ‘चाय पे चर्चा’सारख्या बैठका घेऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी शुक्रवार, १३ मार्च रोजी चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. या बैठकीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, गावकऱ्यांच्या उपस्थितीत व पारदर्शकतेने चर्चा व्हावी यासाठी ही बैठक थेट अब्दुल लाट ग्रामपंचायत कार्यालयातच घेण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर गावातील सर्व नागरिकांनी शुक्रवार, १३ मार्च रोजी दुपारी ठरलेल्या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीप्रश्नाबाबत असलेल्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.तसेच विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती तसेच गावातील सर्व जागरूक नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केले आहे.दरम्यान, बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास १६ मार्चपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!