मोबदला न मिळाल्याने कनवाड म्हैशाळ बंधाऱ्यावर संतप्त शेतकऱ्यांनी धडक देत काम बंद पाडले

Spread the love
कनवाड / प्रतिनिधी 


कनवाड परिसरातील म्हैशाळ बंधाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा तसेच भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट धरणाच्या कामाच्या ठिकाणी धडक देत सुरू असलेले काम बंद पाडले.यावेळी जेसीबी,पोकलेन मशीन आणि डंपर बाहेर काढून म्हैशाळकडे रवाना करण्यात आले.म्हैशाळ बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात वाहून गेल्या आहेत.याबाबत पंचनामे होऊन तब्बल आठ महिने उलटले तरी संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलेला नाही.तसेच ज्या ठिकाणी धरणाचे बांधकाम होणार आहे त्या शेतकऱ्यांनाही भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या प्रकरणी सुमारे महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी कामाचे मोजमाप थांबविल्यानंतर शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेऊन एक महिन्याच्या आत मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.तोपर्यंत वाहून जाणाऱ्या जमिनींना संरक्षक बांध घालण्याच्या कामास परवानगी द्यावी,अशी विनंतीही त्यांनी शेतकऱ्यांना केली होती.शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून बांधाच्या कामाला परवानगी दिली.मात्र प्रत्यक्षात संरक्षक बांधाचे काम बाजूला ठेवून थेट धरणाच्या मुख्य कामाला सुरुवात करण्यात आली.त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नाकावर टिचून काम सुरू केल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला.या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने शेतकरी धरणाच्या साईटवर दाखल झाले आणि सुरू असलेले सर्व काम बंद पाडले.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की,जोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा तसेच भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही काम सुरू होऊ दिले जाणार नाही.तसेच प्रशासनाने पुन्हा जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,मुस्तफा इनामदार, पोपट राणे, संभा माने, वाजिदअली इनामदार, संभाजी खाडे,इर्शाद इनामदार, रियाज इनामदार, सत्तार पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!