जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील रेल्वे स्टेशन उदगाव रोडवरील नव्याने सुरू झालेल्या ‘राज लॉजिंग अँड बोर्डिंग’वर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा वृंदावन हाइट्स अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी, नगररचना विभाग तसेच पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लॉज इमारतीलगत निवासी भाग असून वृंदावन हाइट्स अपार्टमेंटमध्ये सुशिक्षित नागरिक, नोकरदार वर्ग तसेच लहान मुले वास्तव्यास आहेत.लॉजचे प्रवेशद्वार अपार्टमेंटच्या गेटलगतच असल्याने दररोज विविध ठिकाणांहून येणाऱ्या जोडप्यांची वर्दळ वाढली आहे. यामुळे परिसरात संशयास्पद हालचाली, रात्री गोंधळ, वाहनांची गर्दी आणि महिला व मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.सदर भाग हा निवासी झोनमध्ये मोडत असून परवानगी देताना स्थानिक नागरिकांच्या हरकती घेणे आवश्यक होते.मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता लॉज सुरू करण्यास नगररचना विभागाने मदत केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच अग्निशमन, आरोग्य विभाग, पोलीस परवाना आदी आवश्यक बाबींची पूर्तता झाली आहे का, याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.नगरसेवक राहुल बंडगर, सचिन चौगुले, प्रवीण बलदवा आणि सागर मादनाइक यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. नगररचना विभागात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.यानंतर रहिवाशांनी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सखोल चौकशी करून योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन देत तक्रार अर्ज आवक विभागात दाखल करण्यात आला आहे.नगरपालिकेच्या नियमावलीतील अनुक्रमणिका तीननुसार, लॉज व्यवसायाबाबत शेजारील नागरिकांची हरकत आल्यास तो व्यवसाय बंद करणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तात्काळ कारवाई करून राज लॉज बंद करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.