बेकायदेशीर माती वाहतूक तात्काळ बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन

Spread the love

कवठेगुलंद – आलास मार्गावर ग्रामस्थांचा डंपरांना अडवून इशारा

कवठेगुलंद / प्रतिनिधी

कवठेगुलंद – आलास मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर माती वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला.भरधाव वेगाने धावणारे आणि क्षमतेपेक्षा अधिक माती भरून वाहतूक करणारे डंपर थेट रस्त्यावर अडवत ग्रामस्थांनी प्रशासनाला कडक इशारा दिला.नियमांचे उघड उल्लंघन करत सुरू असलेली ही वाहतूक तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.शिरोळ तालुक्यातील आलास,औरवाड, शेडशाळ परिसरातून मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन करून ती शहरी भागात नेली जात आहे.मात्र या प्रक्रियेत वाहतूक नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अनेक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जादा माती भरली जात असून माती वरपर्यंत रचलेली दिसून येते.परिणामी रस्त्यावर माती सांडून धुळीचे लोट उडत आहेत.यामुळे दुचाकीस्वार,पादचारी आणि इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.भरधाव वेगामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रशासन मात्र गप्प का,असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुजमिल पठाण,असिफ पठाण,विनोद आलासे,प्रशांत शेट्टी,मालगावे यांच्यासह ग्रामस्थांनी आलास – कवठेगुलंद मार्गावर डंपर अडवून वाहतूक रोखली. चालक व मालकांना जाब विचारत बेकायदेशीर वाहतूक तात्काळ थांबवावी,अशी ठाम मागणी करण्यात आली.पोलिसांच्या मध्यस्थीने काही वेळाने परिस्थिती निवळली आणि वाहने सोडण्यात आली.दरम्यान,बुबनाळ मार्गेही अशीच माती वाहतूक सुरू राहिल्यास गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील,असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी,अन्यथा जनक्षोभ अनावर होईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!