शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा “गावगाडा” पुरस्कार यंदा साहित्यिक डॉ.राजश्री पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्य योगदानाबद्दल जाहीर झाला आहे.राज्यभरातील सकस,निरपेक्ष आणि मूल्याधिष्ठित साहित्यनिर्मितीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला जातो. डॉ.पाटील यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणून हा सन्मान जाहीर झाल्याने शिरोळ तालुक्यासह संपूर्ण साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ.राजश्री पाटील यांच्या “आणि चांदणे उन्हात हसले” या गाजलेल्या कादंबरीसह त्यांनी आजवर १२ हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.याशिवाय सुमारे ५० हून अधिक कथा, कविता,चारोळ्या आणि ललित लेखनातून त्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.त्यांच्या लेखनात ग्रामीण जीवनाचे वास्तव, स्त्रीमनाची सूक्ष्म जाण, सामाजिक जाणीव आणि मानवी भावभावनांचा प्रभाव दिसून येतो.या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना सोमनाथ टकले यांनी सांगितले की,डॉ.पाटील यांचे साहित्य हे केवळ मनोरंजन करणारे नसून समाजाला विचार करायला लावणारे आहे.त्यांच्या लेखनातील संवेदनशीलता आणि वास्तवदर्शी शैली यामुळे त्या खऱ्या अर्थाने गावगाडा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.डॉ.पाटील यांनी सातत्याने साहित्यसेवा करत ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवण्याचे कार्य केले आहे.विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून अनेक व्यासपीठांवर त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले आहेत.गावगाडा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिरोळ तालुक्यातील साहित्यप्रेमी, सामाजिक संस्था तसेच विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर नवोदित लेखक-लेखिकांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ.राजश्री पाटील यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून,त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.