शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवड गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून,या निवडीकडे शिरोळ शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.उपनगराध्यक्षपदी यादव पॅनेलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड निश्चित मानली जात असून,स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक नेते सचिन शिंदे व युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांना संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.शिरोळ नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिव – शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले आहे.या निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठा बदल झाला असून,यादव पॅनेलची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे.बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी शिरोळ नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे आपला पदभार स्वीकारणार आहेत.पदभार स्वीकारल्यानंतर यादव पॅनेलचे सर्व नगरसेवक एकत्रितपणे पालिकेत प्रवेश करणार असून,हा क्षण ऐतिहासिक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.यावेळी यादव पॅनेलचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यानंतर गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी यादव पॅनेलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड सर्वानुमते होण्याची शक्यता आहे.त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान,स्वीकृत नगरसेवक पदासाठी सामाजिक व शेतकरी चळवळीतील योगदान लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.या निवडीमुळे नगरपालिकेच्या कारभारात नव्या विचारांना व सामाजिक प्रश्नांना अधिक वाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शिरोळ नगरपालिकेतील या घडामोडींमुळे आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.