भावली,भात,टाचण्या मारलेले लिंबू, बुक्का आणि गुलाल भानामतीचा प्रकाराने खळबळ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मंगळवार,२ डिसेंबर मतदान सुरू असून,गेल्या दहा दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराची जोरदार धडाकेबाजी केली आहे.आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींमुळे रंगलेली निवडणूक अधिकच तापलेली असताना आज सकाळी प्रभाग क्रमांक सहा मधील एका तिकटी रस्त्यावर भानामतीचा प्रकार उघडकीस आला. रस्त्याच्या कडेला भावली,भात,टाचण्या मारलेले लिंबू, बुक्का आणि गुलाल अशा वस्तू ठेवलेल्याचे निदर्शनास आले.या प्रकारामुळे परिसरात काही काळ चर्चा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.समितीचे सदस्य खंडेराव हेरवाडे व सचेतन बनसोडे यांनी या भानामतीसारख्या वाटणाऱ्या साहित्याची पाहणी करून हा प्रकार पूर्णपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे स्पष्ट केले.अशा वस्तूंनी कोणतेही साध्य होत नाही.हा प्रकार केवळ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असून नागरिकांनी अजिबात घाबरू नये,असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी अंनिस कार्यकर्त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेकदा अशा अफवा,भितीदायक साहित्य किंवा भानामतीचे प्रयत्न मुद्दाम घडवून आणले जातात,असे सांगितले.लोकशाहीतील निवडणूक ही विकासासाठीची प्रक्रिया आहे.अशा अंधश्रद्धापूर्ण प्रकारांनी मतदारांच्या मनावर परिणाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नागरिकांनी थारा देता कामा नये,असे आवाहनही हेरवाडे व बनसोडे यांनी केले.दरम्यान,या प्रकाराची माहिती पोलिसांनाही देण्यात आली असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.मतदान सुरू असल्याने परिसरात अतिरिक्त गस्त तैनात करण्यात आली आहे.नागरिकांनी शांततेत मतदान करून अशा अफवा व अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन प्रशासन आणि अंनिसकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!