शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चुरशीने ७८.२३ टक्के मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वादाचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.सायंकाळी उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. एकूण २४५३९ पैकी १९१९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे.आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,पृथ्वीराज यादव, प्रताप उर्फ बाबा पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिरोळ नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होत आहे.या पदासाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.याचबरोबर एकूण १० प्रभागांतून नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ७० उमेदवार आपले भविष्य आजमावित आहेत.ताराराणी आघाडी,राजर्षी शाहू आघाडी,शिव शाहू यादव आघाडी या निवडणुकीस सामोरे जात असून,गत निवडणुकीतील शाहू आघाडीतील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील,माजी खासदार राजू शेट्टी यांनी पृथ्वीराज यादव यांच्या सोबत शिव शाहू यादव आघाडी करत मोट बांधली,तर माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडी,त्यांच्या विरोधात आमदार अशोकराव माने यांनी भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडी स्थापन करून निवडणुकीत रंगत आणली.याबरोबर
अनेक अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मंगळवारी सकाळी साडेसात वाजता २७ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार मतदारांचे स्वागत करताना दिसत होते.आपल्या आघाडीच्या उमेदवारास अधिकाधिक मतदान व्हावे,यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती.मा.खा.राजू शेट्टी, आम.अशोकराव माने,मा.आ.उल्हास पाटील,पृथ्वीराजसिंह यादव,अनिल यादव,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,या प्रमुखांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या.
एकूण २४ हजार ५३९ नोंदणीकृत मतदारांपैकी १९ हजार १९६ मतदारांनी मतदान केले.यात पुरुष मतदार १२१४१ पैकी ९६४८ तर स्त्री मतदार १२३९७ पैकी ९५४७ यांनी मतदान केले.याशिवाय एक तृतीयपंथी मतदारानेही मतदानाचा हक्क बजावला.सर्वाधिक मतदान न्यू इंग्लिश स्कूल केंद्र क्रमांक ५/१ येथे ८५.१३ % नोंदविले गेले.तर तुलनेने कमी मतदान कन्या विद्या मंदिर दत्तनगर येथील १/२ या केंद्रावर ६७.६५ % इतके झाले.मतदानानंतर मतपेट्या सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेत केंद्र क्रमांक २/१ ने सर्वात प्रथम मतदान यंत्र तहसील कार्यालयात जमा केले,त्यानंतर केंद्र क्रमांक ८/१ ने दुसऱ्या क्रमांकाने यंत्र जमा केले.यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार केळकर यांच्या हस्ते करण्यात आला.मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेने संवेदनशील प्रभागातील मतदान केंद्रावर जादा बंदोबस्त तैनात केला होता.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदान केंद्रांवर भेटी दिल्या.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यासह उपअधीक्षक,निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली.मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रभाग ९ मधील निकालाची उत्सुकता
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणूक लढवली असून त्यांच्या विरोधात पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे पुतणे पद्मसिंह पाटील हे आमने-सामने आहेत.प्रथमच पाटील समाजाच्या गटात फूट पडली असल्याने बाबा पाटील व अमरसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या प्रभागातून कोण निवडून येणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.