शिरोळ / प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांची गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षा होत असल्याची भावना व्यक्त होत असताना,या प्रश्नांची जाण ठेवून त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याच्या निर्धाराने सौ.वर्षा रुपेश मोरे या आगामी निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.प्रभागातील रस्ते,पिण्याचे पाणी,ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या सर्व विषयांवर ठोस पाठपुरावा करून प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची भूमिका सौ.मोरे यांनी मांडली आहे. प्रभागातील महिलांचा व युवतींचा आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण हा सौ.वर्षा मोरे यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे.शासनाच्या विविध योजना, रोजगाराभिमुख उपक्रम तसेच उद्योग व्यवसायासाठी उपलब्ध असणाऱ्या अनुदान व प्रशिक्षण सुविधा यांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. उद्योगधंद्यात महिलांची भागीदारी वाढवणे, स्वयंसहाय्यता गटांना सक्षम करणे तसेच तरुणींसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.प्रभागातील प्रश्नांची प्रत्यक्ष जाण असलेल्या आणि स्थानिक नागरिकांमध्ये सक्रिय सहभाग राखणाऱ्या वर्षा मोरे यांच्या उमेदवारीला युवा मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.तरुण मतदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रचाराला प्रभागात मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.स्थानिकांमध्ये त्या एक खंबीर,प्रामाणिक आणि प्रश्न उपस्थित करून त्यावर ठोस मार्ग काढणाऱ्या नेतृत्व म्हणून ओळखल्या जात आहेत.नागरिकांशी संवाद साधताना प्रभागाचा सर्वांगीण विकास,महिलांसाठी सुरक्षित आणि प्रगत वातावरण, तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे मुद्दे त्या सातत्याने मांडत आहेत.त्यामुळे प्रभागातील मतदार देखील त्यांना सक्रीय पाठिंबा देताना दिसत आहेत.प्रभाग क्रमांक ४ च्या विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सौ.वर्षा मोरे यांनी सांगितले.