शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपा उपजिल्हाध्यक्ष मुकुंद गावडे यांनी ताराराणी आघाडीच्या सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावडे यांनी यापूर्वी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावली असून, स्थानिक प्रशासनातील कामकाजाचा त्यांना ठोस अनुभव असल्याचे जाणकारांचे मत आहे.मुकुंद गावडे यांच्या कार्यकाळात प्रभागातील अनेक मूलभूत सुविधांची उभारणी झाली आहे.नागरिकांच्या अडचणींना तातडीने मार्गी लावण्यात त्यांनी सातत्य दाखवले असून विकासाला प्राधान्य देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे.त्यांनी सदैव लोकसंपर्क आणि समन्वय यावर भर दिला असून,यामुळे स्थानिक समस्यांचे त्वरित निराकरण शक्य झाले आहे.सध्या मुकुंद गावडे भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.तसेच,त्यांनी शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली असून पक्ष संघटनशक्ती आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे प्रभागातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल,असा नागरिकांचा विश्वास आहे.प्रभाग पाचमध्ये रस्ते,पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत गरजांबरोबरच सामाजिक उपक्रमांनाही मुकुंद गावडे प्राधान्य देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. त्यांच्या जनसंपर्क कौशल्यामुळे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेल्या संवादामुळे गावडे यांचा प्रभागातील विकासासाठी ठोस पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.स्थानिक जनता आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुकुंद गावडे यांना मोठा पाठिंबा दिला असून, आगामी निवडणुकीत प्रभाग पाचमध्ये राजकीय रंगत पाहायला मिळणार आहे.उमेदवार म्हणून त्यांच्या कार्यकाळातील अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे ही निवडणूक अत्यंत स्पर्धात्मक आणि उत्सुकतेची ठरणार आहे.