शिरोळ / प्रतिनिधी
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी श्वेता विश्वास काळे यांनी आज अत्यंत साधेपणाने आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला.कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता,शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्वेता काळे म्हणाल्या,आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिरोळ शहराच्या विकासाला गती मिळाली आहे.त्याच विकास परंपरेला पुढे नेण्यासाठी मी या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे आणि एक आधुनिक, स्वच्छ, सुबक शिरोळ घडविणे हा आपला ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या,जनतेने मला एक संधी दिल्यास,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिरोळ शहराचा कायापालट करेन.महिलांसाठी रोजगारनिर्मिती, शहरातील स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्त्यांचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देईन.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, विश्वास (दादा) काळे,अभिजीत चुडमुंगे तसेच राजर्षी शाहू विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि संयमाने पार पडला.श्वेता काळे यांच्या साधेपणाने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या उमेदवारीने शिरोळच्या राजकारणात नवा उत्साह संचारल्याचे चित्र दिसून आले आहे.