शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये जाधव कुटुंबीयांवर लक्ष केंद्रित

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शहरातील राजकारण तापले असून विविध गट,नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींमुळे वातावरण चांगलेच रंगत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्वर्गीय आनंदराव उर्फ बबनराव जाधव यांच्या कुटुंबाच्या उमेदवारीवरून मोठी राजकीय चाचपणी सुरू आहे.स्व.आनंदराव उर्फ बबनराव जाधव हे शिरोळ शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करणारे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी नगरपरिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी मोठे योगदान दिले होते.त्यांच्या कार्याची परंपरा आजही नागरिकांच्या मनात कायम असून, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाबाबत चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, स्व.जाधव यांचे सुपुत्र युवराज जाधव यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणूक लढवावी,अशी जोरदार मागणी युवा वर्गातून पुढे येत आहे.आपल्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवराज यांनी पुढे यावे असे म्हणत अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्याकडे आग्रह धरला आहे. युवराज जाधव हे समाजकारणात सक्रिय असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकसंपर्क आणि सामाजिक कार्यात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळते.प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये जाधव कुटुंबीयांचे निर्णायक मतदान असल्याने या प्रभागात कोण उमेदवार उतरतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक राजकारणात जाधव कुटुंबाची प्रभावी छाप असल्याने त्यांच्या निर्णयावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.शिरोळ नगर परिषदेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे,तसतशा राजकीय हालचालींना वेग आला असून,प्रभाग ९ मधील जाधव कुटुंबाच्या निर्णयाची सर्वत्र उत्सुकता आहे.युवराज जाधव निवडणूक रिंगणात उतरतात का,हे पाहणे आता शिरोळकरांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!