शिरोळ / प्रतिनिधी
“कामाची प्रचंड आवड आणि ते पार पाडणारे उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे अरविंद नेर्ले,” असे गौरवोद्गार पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी काढले.पद्माराजे विद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभाग, शिरोळ येथील प्राध्यापक अरविंद नेर्ले यांच्या सेवापूर्ती समारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानी बोलत होते.नेर्ले सरांनी 28 वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहून दोन पिढ्यांना स्वावलंबी बनवले, असे आसगावकर यांनी नमूद केले.प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील आणि महाराष्ट्र राज्य विनाअनुदान कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि रयत गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.उपमुख्याध्यापिका सौ. एस.एम.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यानंतर श्री. व सौ. अरविंद नेर्ले यांचा सत्कार सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन करण्यात आला. मानपत्राचे वाचन अविनाश माने यांनी केले.माजी विद्यार्थी स्वरूप कोळी, मुकुंद लोंढे, प्रा.एम.झेड.मगदूम,आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.अमरसिंह माने पाटील यांनी नेर्ले सरांच्या कार्यामुळे शिरोळ परिसरातील विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळले, असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना नेर्ले सरांनी कष्टातून शिक्षण घेतल्याची आठवण करून दिली. “रयत शिक्षण संस्थेमुळे माझी भरभराट झाली. माझा भाऊ अशोक, बहीण आणि कर्मवीर अण्णांचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला जी. एस. पाटील, एन. वाय. जाधव, प्रताप उर्फ बाबा पाटील, तुकाराम राणे, राजकुमार कोळके आदींसह विविध शाखांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, रयत सेवक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन वैशाली दाभाडे,तर आभार पर्यवेक्षक डी. बी. कोडोलकर यांनी मानले.