“कौतुकास्पद” विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी पालकाचा पुढाकार: शिरोली मराठी शाळेच्या पटांगणात स्वखर्चाने स्वच्छता

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

 

शिरोली पुलाची येथील मराठी शाळेतील पटांगणाची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून शाळा प्रशासनाने वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली होती.मात्र,शाळेच्या परिसरातील वाढलेली झुडपं,साचलेली घाण आणि साप व विंचवांसारख्या प्राण्यांचा वावर याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सातत्याने दुर्लक्षच केले.येथील पालक आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेले असता पटांगणात साप वावरताना पाहिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे हे लक्षात घेतले.या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत,शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक सलमान देसाई यांनी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.त्यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता,त्यांनी स्वतःच्या खर्चाने JCB मशिन लावून शाळेच्या पटांगणातील सगळी घाण,कचरा, झाडझुडपं स्वच्छ करून प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.या सकारात्मक उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळाले असले तरी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.गावातील शासकीय यंत्रणा अशा प्रकारे जबाबदारी झटकून बसतात आणि एक सामान्य नागरिक जबाबदारीने पुढाकार घेतो,ही वस्तुस्थिती अनेक प्रश्न उभी करत आहे.शाळेतील इतर पालक व शिक्षकांनीही सलमान देसाई यांच्या उपक्रमाचे कौतुक केले असून,अशा प्रकारच्या नागरिकांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!