कुरुंदवाड / प्रतिनिधी
दत्तवाड (ता. शिरोळ) येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक कार्यालय,इचलकरंजीच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी अड्डा चालकासह सात जुगारींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ सुनील पाटील,अल्ताफ सय्यद, सागर हरगुले या पथकाने ही कारवाई केली.
दत्तवाड येथे रात्री १० वाजण्याच्या सुमारास वेशीच्या रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन पत्ती जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला.पोलिसांच्या अनपेक्षित कारवाईमुळे जुगाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगत सुशांत संजय वाघे (वय.२८),सतिश परशुराम वडर (वय.३६) राजू भरमू पवार (वय.५७), मोहन अरुण माळगे (वय.३८), नावल धोंडीराम कांबळे (वय.२२)साकिब अकबर काले (वय.२२,सहाजण रा.दत्तवाड ता. शिरोळ),धिरज बाळू कांबळे (वय ३१ रा. दानवाड,ता.शिरोळ)या सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले,या कारवाईत पोलिसांनी तीन मोटारसायकली, तीन मोबाइल फोन आणि रोख १० हजार रुपये असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.