मालमत्ता करातील त्रुटी दुरुस्तीसाठी शिरोळ पालिकेकडून फेरमूल्यांकन! ठेकेदाराची असमर्थता; नव्याने पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय, मालमत्ताधारकांना तूर्तास कर भरण्याचे आवाहन
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्तांच्या कर आकारणीमध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे समोर आल्यानंतर आता पालिका प्रशासनाने मालमत्तांचे नव्याने मूल्य निर्धारण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील त्रुटी दुरुस्त करण्यास संबंधित ठेकेदाराने असमर्थता दर्शविल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेर पुनर्सर्वेक्षण करून मालमत्ता कराची यादी दुरुस्त करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. मात्र, नव्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मालमत्ताधारकांनी सध्या आकारणी करण्यात आलेला घरफाळा आणि पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे.
शिरोळ नगरपालिकेच्या मागील मालमत्ता कर सर्वेक्षणामध्ये अनेक त्रुटी राहिल्याच्या तक्रारी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्या होत्या. काही मालमत्तांच्या कर आकारणीमध्ये तफावत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मूल्य निर्धारण अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार प्राधिकृत मूल्य निर्धारण अधिकारी तथा नगररचनाकार, कोल्हापूर यांनीही मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करून कर निर्धारण यादीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यासाठी ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, कोल्हापूर या संबंधित ठेकेदाराला पालिकेने पत्रव्यवहार केला. मात्र, संबंधित ठेकेदाराने त्रुटी दुरुस्तीचे काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने पालिकेला आता नव्याने पुनर्सर्वेक्षणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहाराचे क्यूआर कोडद्वारे उपलब्ध असलेले तपशीलही नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
कर कमी-जास्त झाल्यास समायोजन होणार
नव्या पुनर्सर्वेक्षणानंतर मालमत्तांचे मूल्यांकन करून कर आकारणीतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. नव्या मूल्यांकनानुसार एखाद्या मालमत्तेचा कर कमी अथवा जास्त निश्चित झाल्यास त्यानुसार पूर्वीच्या कराची रक्कम समायोजित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या मालमत्ताधारकांना मागील सर्वेक्षणाच्या आधारे तात्पुरती कर मागणी देयके देण्यात आली आहेत. पुनर्सर्वेक्षणानंतर या देयकांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालिकेची घरफाळा व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, मालमत्ताधारकांनी सध्याची देय रक्कम वसुली लिपिकांकडे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे कर आकारणीतील त्रुटी मान्य करून फेरमूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय आणि दुसरीकडे सध्याचा कर भरण्याचे आवाहन, यामुळे मालमत्ताधारकांचे लक्ष आता नव्या मूल्यांकनाकडे लागले आहे. पुनर्सर्वेक्षण पारदर्शकपणे होऊन नागरिकांना न्याय मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.