शिरढोण पुलावर जलपर्णीचा विळखा; प्रशासन जागे होणार कधी? मोठ्या दुर्घटनेची भीती
कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीपात्रातील प्रचंड जलपर्णी शिरढोण – कुरुंदवाड मार्गावरील शिरढोण पुलाला येऊन अडकल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पुलाला तब्बल तीन ते चार फूट उंचीचा जलपर्णीचा थर चिकटल्यामुळे पाण्याचा प्रचंड दाब निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी जलपर्णीच्या वाढलेल्या दाबामुळे शिरोळ बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला होता.त्या घटनेतूनही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याची टीका होत आहे. कोकण घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.अशा परिस्थितीत पुलावर अडकलेल्या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडत असून पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
नदीकाठावरील शेतजमिनींमध्येही जलपर्णीचे मोठे थर साचल्याने पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. प्रदूषणामुळे वाढलेल्या जलपर्णीचा फटका आता शेती, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेलाही बसत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे यांनी शिरोळ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता येसणे तसेच कुरुंदवाड येथील शाखा अभियंता आनंद गाडे यांची भेट घेऊन जलपर्णी तातडीने हटविण्याची जोरदार मागणी केली.यावेळी परिस्थितीची सविस्तर माहिती देत विलंब झाल्यास गंभीर परिणामांना प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला. पाटबंधारे विभागाने जलपर्णी हटविण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीचीच आता नागरिकांना अपेक्षा आहे.