शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दक्षिणेकडील संरक्षण भिंत महापुराच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. संपूर्ण बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्याची दुरवस्था होत असल्याचा आरोप होत असतानाच आता प्रत्यक्ष संरक्षण भिंत कोसळल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करून या बंधाऱ्याचे अस्तित्व टिकवावे अशी मागणी होत आहे.
तत्कालीन माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील आणि आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या दूरदृष्टीतून पंचगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याने शिरोळ तालुक्यातील पश्चिम भागातील हजारो एकर शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. याचबरोबर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या बंधाऱ्यामुळे कायमस्वरूपी मार्गी लागला होता. गेल्या अनेक दशकांपासून हा बंधारा तालुक्याच्या जलजीवनाचा आधार बनला आहे. तसेच हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका या बंधाऱ्याने निभावली होती.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. संरक्षण भिंती, मोहरी आणि इतर संरचनांची मोठ्या प्रमाणात झीज होत असतानाही पाटबंधारे विभागाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही ती केवळ कागदोपत्रीच राहिली. राजकीय हेवेदावे, परस्पर आरोप-प्रत्यारोप आणि उदासीन प्रशासनामुळे या महत्त्वाच्या जलसंपत्तीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सुमारे तीन वर्षांपूर्वी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूच्या मोहरीचे काम करण्यात आले होते. मात्र या कामाच्या दर्जाबाबत त्यावेळीच अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाचा निधी वाया गेल्याची टीकाही झाली होती. दुसरीकडे, पूर्वेकडील बाजूचे दगड अनेक दिवसांपासून ढासळत असून बंधारा धोकादायक बनल्याची वस्तुस्थिती वारंवार निदर्शनास आणून देण्यात आली होती. तरीही खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
अखेर याच दुर्लक्षाची मोठी किंमत मोजण्याची वेळ आली असून महापुराच्या पाण्यात बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूचा संरक्षण कठडा पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक धोकादायक बनली असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच बंधाऱ्याच्या मुख्य संरचनेलाही भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बंधाऱ्याची तांत्रिक पाहणी करून संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम, संपूर्ण बंधाऱ्याची मजबुतीकरणाची कामे आणि वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था त्वरित उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात बंधाऱ्याचे अधिक नुकसान होऊन शिरोळ तालुक्याच्या शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चौकट – शिरोळ बंधाऱ्यामुळे मच्छीमाऱ्यांना होता दिलासा
शिरोळ बंधाऱ्यामुळे शहरातील अनेक मच्छीमाऱ्यांना दिलासा मिळत आहे. गेली अनेक वर्ष या बंधाऱ्याची दुरावस्था पाहतो आहे. वेळीच लक्ष दिले असते तर आज बंधारा सुरक्षित राहिला असता बंधाऱ्याची संरक्षण कठडा वाहून गेल्यामुळे भविष्यात बंधारा धोकादायक ठरणार आहे.त्यामुळे खासदार आमदार यांनी या बंधाऱ्याच्या दुरावस्थाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
समीर दिलावर मुजावर – मच्छीमार व्यवसायिक
पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शिरोळ बंधाऱ्याचे बरगे न काढल्याने शिरोळच्या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.बंधऱ्यातील बरग्यामुळे पाण्याचा दाब बंधाऱ्याला बसल्याने बंधाऱ्याचा संरक्षण कठडा ढासळून गेला आहे.याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारेचे अधिकारीच आहेत
बंडू पाटील – स्वाभिमानी शेतकरी संघटना