शिरोळ | प्रतिनिधी
शिरोळ शहर मेकॅनिक असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. अध्यक्षपदी बाळासो कोळी यांची, तर उपाध्यक्षपदी मुकूंद उर्फ बंडू लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी राजाराम कोगले, तर खजिनदारपदी अजय सावंत यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शहरातील मेकॅनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या माध्यमातून सर्व मेकॅनिकांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.शहरातील सर्व मेकॅनिकांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक असोसिएशनचे मावळते अध्यक्ष उमेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्वानुमते व बिनविरोध झालेल्या निवड प्रक्रियेमुळे संघटनेतील एकोप्याचे दर्शन घडले.निवडीनंतर नूतन अध्यक्ष बाळासो कोळी यांनी बोलताना,मेकॅनिकांच्या विविध समस्या सोडविणे,त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे तसेच संघटनेला अधिक सक्षम व प्रभावी बनविण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कार्य केले जाईल,” असे सांगितले. नव्या कार्यकारिणीने मेकॅनिकांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासह सामाजिक आणि व्यावसायिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.या बैठकीस अनंत शिंदे, ओंकार जाधव, आशुतोष पाटील, अब्दुल कागवाडे, उमेश भोसले, सोनू आरगे, बरकत सय्यद, विशाल भाट, विशाल खांडेकर, अमित जगदाळे, शेखर ढवळे, रियाज मकानदार, कौस्तुभ पाटील, दीपक काळे, वैभव लोंढे यांच्यासह शहरातील अनेक मेकॅनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.निवडीनंतर असोसिएशनच्या वतीने नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाली. संघटनेच्या माध्यमातून सदस्यांमध्ये समन्वय वाढविणे, व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणे आणि मेकॅनिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.