पर्यावरणपूरक व रासायनिकमुक्त शेतीतील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल; राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत सन्मान
शिरोळ / प्रतिनिधी
शाश्वत, पर्यावरणपूरक आणि रासायनिकमुक्त शेतीच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिरोळचे सुपुत्र तथा कृषीतज्ञ प्रवीण माळी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२३’ ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये कृषीदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सौ.कल्पना माळी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२३ व २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान करताना राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांनी आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींचा स्वीकार करणारे शेतकरी हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. समृद्ध, आधुनिक आणि शाश्वत शेतीच्या बळावर महाराष्ट्र भविष्यात जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कृषीतज्ञ प्रवीण माळी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रासायनिकमुक्त शेती, विषमुक्त अन्ननिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर सातत्याने जनजागृती केली आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना नैसर्गिक व शाश्वत शेतीचे मार्गदर्शन करून उत्पादनवाढीसोबतच जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला त्यांनी प्रभावी दिशा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी पर्यावरणपूरक शेतीकडे वळले असून शेतीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडत आहे.
प्रवीण माळी यांच्या या कार्याची राज्य शासनाने सर्वोच्च कृषी पुरस्काराने दखल घेतल्याने शिरोळसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवकांसाठी तसेच नवोदित शेतकऱ्यांसाठी प्रवीण माळी यांचे कार्य प्रेरणादायी ठरत असून शाश्वत शेतीच्या चळवळीला त्यांच्या योगदानामुळे नवी ऊर्जा मिळाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.