हेरवाड / प्रतिनिधी
दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अचानक मधमाश्यांच्या थव्याने हल्ला चढवल्याने मोठी खळबळ उडाली.या हल्ल्यामुळे उपचारासाठी आलेले रुग्ण,त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ झाली. मधमाश्यांच्या दंशामुळे काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे रुग्णालय येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीत हलवण्यात आले आहे. या इमारतीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधमाश्यांचे मोठे पोळे होते.मंगळवारी दुपारी अचानक या मधमाश्या आक्रमक झाल्या आणि त्यांनी समोर दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला चढवला. मधमाश्यांचा थवा अंगावर येत असल्याचे पाहताच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.अनेकांनी चाव्यापासून वाचण्यासाठी डोके आणि तोंड कपड्याने झाकून घेतले,तर काही जण मिळेल त्या आडोशाला लपले. काहींनी जवळच्या दुकान,बेकरीमध्ये गेले.या गोंधळात काही जणांना मधमाश्यांनी चावा घेतल्याने ते किरकोळ जखमी झाले.घटनेची तीव्रता लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने तातडीने हालचाल करत परिस्थिती नियंत्रणात आणली.जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालयातच प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने,या घटनेत कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही.
“रुग्णालय परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत.प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाण्याच्या टाकीवरील धोकादायक पोळे त्वरित हटवावे, जेणेकरून भविष्यात मोठा अनर्थ टळेल.”
— स्थानिक नागरिक
रुग्णालय परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.दत्तवाड ग्रामपंचायत प्रशासनाने रुग्णालय परिसरातील हे धोकादायक पोळे तात्काळ काढून टाकावे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी जोर धरत आहे.
चौकट
दरम्यान सोमवारी गरोदर माता, लहान बालके यांच्यासाठी लसीकरण करण्यात येते.काल जर ही घटना घडली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता हा विचारच अंगावर शहारे आणणारा ठरतो. गतवर्षी ही असाच मधमाशांनी हल्ला केला होता.