पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागाव (ता. हातकणंगले) येथील समतानगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महिलांसाठी के .के . भाऊजी होम मिनिस्टर कार्यक्रमादरम्यान महिलांच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महिलांनी एकत्र येत मनुस्मृती प्रतिमेचे दहन केले आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. याप्रसंगी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध खेळांचा आनंद लुटला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना अॅडव्होकेट सौ सायली जाधव यांनी मनुस्मृती दहनामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या साखळदंडांतून महिलांना मुक्त केले. आज समाजातील प्रत्येक स्तरावर महिलांना जे मानाचे स्थान आणि प्राधान्य मिळत आहे, ते केवळ बाबासाहेबांच्या शिकवणीमुळेच शक्य झाले आहे. महिलांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहून सन्मानाने जगले पाहिजे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर’ खेळामध्ये गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अतिशय रंगतदार झालेल्या या स्पर्धेत महिलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. यामध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना मानाच्या पैठणी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक वर्षा दिवेकर , द्वितीय क्रमांक सौ गीता कांबळे , तृतीय क्रमांक पुजा शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला . या हसतखेळत झालेल्या या कार्यक्रमाने नागावमधील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांना उजाळा देण्यात आला. यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव व कमिटीचे सर्व सदस्य , पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .