कोल्हापूर-सांगली महामार्गावर टँकरच्या धडकेत टेम्पो पलटी, तीन जण जखमी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर हालोंडी गावच्या हद्दीत आज दुपारी टँकर आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन तिघेजण जखमी झाले असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २.१५ वाजण्यासुमार सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा टँकरचे क्रमांक (क्र. KA-32-AB-5374) देवगिरी पेट्रोल पंपसमोर आला असता,चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्ता ओलांडणाऱ्या स्वराज माजदा सम्राट टेम्पोला (क्र. MH-01-CV-8296) उजव्या बाजूने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टेम्पो महामार्गावर डाव्या बाजूला पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील पांडुरंग रंगराव कांबळे (रा. धबधबेवाडी, ता.पन्हाळा) आणि मारुती शंकर माने (रा. जाधववाडी, ता. पन्हाळा) यांच्यासह टँकर चालक अन्वर पाशा जखमी झाला आहे.या अपघातामध्ये टेम्पोचे सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पो चालक सतिष पांडुरंग वर्णे (रा. कळंबा, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालक अन्वर पाशा (रा. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेंगाळ करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!