शिरोळ / प्रतिनिधी
श्री पद्माराजे विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आणि प्रेरणादायी “एक घर पक्ष्यासाठी” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.या नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सुमारे २५० हून अधिक पर्यावरणपूरक पक्षीघरटी स्वतःच्या कल्पनेतून तयार करून निसर्गप्रेमाचा सुंदर संदेश दिला. वाढत्या सिमेंटच्या काँक्रिटीकरणामुळे आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे पूर्वी अंगणात सहज दिसणारे पक्षी आता हळूहळू दुर्मिळ होत चालले आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांना निवारा आणि पाण्याची तीव्र कमतरता भासत आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत पर्यावरणपूरक उपाययोजना राबवली.मुख्याध्यापक डी. बी. कोडोलकर आणि उपमुख्याध्यापिका एस. एम. पाटील यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम साकार झाला. तसेच कलाशिक्षक अविनाश माने, विनोदकुमार मगदूम आणि वैशाली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक, टिकाऊ आणि उपयुक्त अशी घरटी तयार केली. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव यांचा सुंदर संगम घडवून आणला.या उपक्रमाचे उद्घाटन साप्ताहिक ‘पब्लिक पंच’चे संपादक मदनसिंह माने गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाबद्दलच्या जागरूकतेचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली सर्व घरटी शालेय परिसरात तसेच कल्लेश्वर तलाव परिसरातील झाडांवर लावण्यात आली असून त्यामुळे पक्ष्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी ए. डी. पुजारी, ए. व्ही. जाधव, एस. एम. माने, आर. टी. कोळके, तुकाराम राणे, वजीर गवंडी, राजू नाईक, पिंटू गुरव, कैलास ढाले, अमितकुमार कल्याणावर आणि सुशांत पाटील यांसह शिक्षक, पालक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.हा उपक्रम केवळ पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरला आहे.भविष्यातही अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.