श्री भैरेश्वर मंदिरात यात्रेनिमित मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टीचा अद्वितीय सोहळा

Spread the love

शिरटी / प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी गाव सध्या भक्ती,परंपरा आणि उत्साहाच्या संगमाने उजळून निघाले आहे. कृष्णा नदीच्या पवित्र काठावर वसलेले हे गाव आपल्या ग्रामदैवत श्री भैरेश्वराच्या यात्रेसाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जाते. यंदाची यात्रा शनिवारी दि. ११ एप्रिल ते मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडत आहे. शिरटी हे गाव सर्व जाती-धर्मांच्या ऐक्याचे जिवंत उदाहरण आहे. येथे विविध समाजघटक एकत्र येऊन धार्मिक परंपरा जपत सण-उत्सव साजरे करतात. ग्रामदैवतावरील अपार श्रद्धेमुळे श्री भैरेश्वर यात्रा हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचा उत्सव बनला आहे.

प्राचीन मंदिराचा इतिहास आणि अद्भुत आख्यायिका

श्री भैरेश्वर मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि प्रेरणादायी आहे. शिलाहार वंशाच्या राजवटीत हाळभैरी नावाच्या ठिकाणी हे मंदिर अस्तित्वात होते. त्या काळात कृष्णा नदी गावापासून दूर होती. एका महिलेच्या आयुष्यात घडलेल्या करुण प्रसंगामुळे या मंदिराच्या इतिहासाला वळण मिळाले. पाणी आणण्यासाठी नदीकाठी गेलेल्या एका महिलेने तिचे तान्हे बाळ पाळण्यात ठेवले होते. ती पाणी घेऊन परत येईपर्यंत बाळ जागे होऊन रडू लागले आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. दुःखाने व्याकुळ झालेल्या त्या महिलेने श्री भैरेश्वराला साकडे घातले. तिच्या अखंड भक्ती, तपश्चर्या आणि प्रार्थनेमुळे देव प्रसन्न झाला आणि तिला तिचे बाळ परत मिळाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या घटनेनंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन नदीकाठी नवीन गाव वसवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी ग्रामदैवत श्री भैरेश्वर एका ग्रामस्थाच्या अंगात संचारल्याचे सांगितले जाते.देवाने स्वतःला गावाबरोबर नेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने देवाला नव्या ठिकाणी आणले आणि मंदिर उभारले.

अनोखी वास्तुरचना – लाकडी आधारावर उभे मंदिर

शिरटीतील श्री भैरेश्वर मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.संपूर्ण मंदिराचे बांधकाम लाकडी आधारावर करण्यात आले आहे. मंदिर ‘अंतराळी’ पद्धतीने उभारण्यात आले असून त्याचा भार लाकडी संरचनेवर टाकण्यात आला आहे.या रचनेमुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत मंदिराभोवतालच्या भिंती कोसळल्या तरी मंदिराची मुख्य संरचना अबाधित राहू शकते, अशी कल्पकता त्या काळातील कारागिरांनी दाखवली होती. शिरोळ-शिरटी सीमेवरील बाभळीच्या झाडाच्या बुंध्यापासून या मंदिराचे लाकूड वापरण्यात आले होते, असे सांगितले जाते.

अष्टभैरवांपैकी मानाचे स्थान

श्री भैरेश्वराला अष्टभैरवांमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान दिले जाते.खोची येथील काळभैरव सर्वात लहान मानला जातो,तर कर्नाटकातील अक्कोळ, बिळूर आणि नांदणी येथेही भैरेश्वराची मंदिरे आहेत.शिरटीतील श्री भैरेश्वर दक्षिणाभिमुख असून त्यांच्या हातात भिक्षापात्र आहे. त्यांचे वाहन घोडा असून घोड्यावर स्वार होऊन ते गावाचे रक्षण करतात,अशी श्रद्धा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठलाची मूर्ती देखील आहे. त्यामुळे ‘शिरटीचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा हा देव हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

परंपरेचा मान राखणारी नैवेद्य प्रथा

श्री भैरेश्वर मंदिरातील पूजा परंपरेत सामाजिक समन्वयाचे दर्शन घडते. पूर्वी या देवाची पूजा चर्मकार समाजाकडे होती.सध्या ती गुरव समाजाकडे आहे.मात्र आजही यात्रेत पहिल्या नैवेद्याचा मान चर्मकार समाजालाच दिला जातो.ही परंपरा शिरटी गावातील सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाची जाणीव करून देते.

ग्रामविकास आणि आर्थिक समृद्धी

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले शिरटी गाव कृषीप्रधान असून येथील शेतकरी आधुनिक शेती पद्धती वापरून भाजीपाला उत्पादनात आघाडीवर आहेत.शेतीसोबत दुग्धव्यवसाय आणि पशुपालन हा जोडधंदा आहे.गावातील लोकांच्या कष्टाळूपणामुळे आणि देवावरील श्रद्धेमुळे शिरटी हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध गाव म्हणून ओळखले जाते.

कलशारोहणानंतर मंदिराचे नव्याने रूपांतर

दि.२३ एप्रिल २०२४ रोजी श्री भैरेश्वर मंदिरावर कलशारोहण सोहळा अत्यंत भव्य पद्धतीने पार पडला.भाविकांच्या देणगीतून मंदिराचे बांधकाम, रंगकाम आणि सुशोभीकरण पूर्ण झाले आहे.या सोहळ्यासाठी ग्रामस्थ, माहेरवाशिणी, पाहुणे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘ना भूतो ना भविष्यती’ अशा स्वरूपात हा सोहळा पार पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.सध्या मंदिर परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला असून भैरेश्वर युवक यात्रा कमिटी आणि कलशारोहण समितीच्या अथक परिश्रमामुळे मंदिराचे रूप पालटले आहे.

यात्रेतील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम

शनिवार (दि. ११ एप्रिल)

रात्री ८ वाजता ‘गंध फुलांचा’ हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम

मध्यरात्री १२ ते पहाटे ६ – दंडवत सोहळा

रविवार (दि. १२ एप्रिल)

नैवेद्य पूजा आणि भंडारखाना

रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा

सोमवार (दि. १३ एप्रिल – मुख्य दिवस)

सकाळी ९ वाजता श्रींची भव्य पालखी आणि मिरवणूक

हेलिकॉप्टरमधून मंदिर, पालखी आणि नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरावर पुष्पवृष्टी

रात्री ९ वाजता ‘ऑर्केस्ट्रा वैभव’

 मंगळवार (दि. १४ एप्रिल)

– रेणुका देवीची यात्रा आणि ओटी भरणे

– बैलगाडी शर्यत, लुना शर्यती

– संगीत खुर्ची, रिल्स स्पर्धा

– दुपारी ४ वाजता भव्य कुस्ती मैदान

– रात्री ९ वाजता ‘ऑर्केस्ट्रा धमाका’

यंदाच्या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी – आकर्षणाचा केंद्रबिंदू 

यंदाच्या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी. श्री भैरेश्वर मंदिर, पालखी आणि नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरावर फुलांचा वर्षाव होणार असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.हा सोहळा यात्रेच्या भव्यतेत भर घालणारा ठरणार असून यामुळे शिरटीची यात्रा राज्यभर चर्चेत आली आहे.

कुस्ती मैदान आणि पारंपरिक स्पर्धा

मंगळवारी आयोजित करण्यात आलेले कुस्ती मैदान हे यात्रेतील आणखी एक आकर्षण आहे. पैलवान अशोक आप्पासाहेब चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.याशिवाय बैलगाडी शर्यत, लुना रेस, संगीत खुर्ची आणि रिल्स स्पर्धा यामुळे युवक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजला

यात्रेनिमित्त हजारो भाविक शिरटीत दाखल झाले असून मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. भंडारखान्यातील महाप्रसाद, पालखी सोहळा,दंडवत यात्रा यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे.मानकरी, सावलधारक आणि ग्रामस्थ यांच्या सहभागामुळे सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडत आहेत.

सामाजिक एकात्मतेचा आदर्श

शिरटीची श्री भैरेश्वर यात्रा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे.सर्व समाजघटक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.गावातील प्रत्येक व्यक्ती यात्रेच्या नियोजनात सहभागी होते.यामुळे शिरटी गाव एक आदर्श ग्रामसंस्था म्हणून ओळखले जाते.श्री भैरेश्वर मंदिराची यात्रा ही परंपरा, श्रद्धा, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम आहे. प्राचीन आख्यायिका,अनोखी वास्तुरचना, सामाजिक ऐक्य आणि भव्य कार्यक्रमांमुळे ही यात्रा विशेष ठरते. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, भव्य पालखी मिरवणूक, कुस्ती मैदान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शिरटी गाव चार दिवस भक्तिमय जल्लोषात रंगले आहे. ग्रामदैवतावरील अपार श्रद्धा आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे श्री भैरेश्वर यात्रा ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी धार्मिक परंपरा म्हणून ओळखली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!