पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील विद्या मंदिर शिरोली नं. 3 या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम पालक, ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. जी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष अरुण सोडगे होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाचा उल्लेख करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित ‘मिशन अंकुर’ परीक्षेत इयत्ता पहिलीतील कुमारी रिधिमा शिंदे हिने केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच सानवी जाधव व शर्वरी वसगडे यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता दुसरीतील राजवीर पाटील, संग्राम रोहिदास व सम्यक कांबळे यांनीही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले. याशिवाय इयत्ता तिसरी आयएएस स्पर्धा परीक्षेत आदर्श चंदनशिवे, सृष्टी केंगार व जुई भोकरे यांनी यश मिळविले. इयत्ता पाचवी नवोदय परीक्षेत वेदांत पाटील याने यश संपादन करून विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ. शुभांगी मेथे पाटील मॅडम, संजय अनुसे सर तसेच मुख्याध्यापक जी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान नागाव केंद्राचे केंद्रप्रमुख कृष्णा पाटील यांनी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी टीईटी व सीटीईटी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. पंचायत समिती सदस्या सौ. कमल कौंदाडे, मोहम्मद महात, ग्रामपंचायत सदस्या सौ.मनीषा संकपाळ तसेच सल्लागार एकनाथ संकपाळ यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.आपल्या भाषणात सौ. कमल कौंदाडे यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा देत शाळेच्या उत्कृष्ट व दर्जेदार नियोजनाचे कौतुक केले. तर मोहम्मद महात यांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत विद्या मंदिर शिरोली नं. 3 ही शाळा खाजगी शाळांनाही टक्कर देणारी असल्याचे सांगितले. तसेच सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळेत घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, नाटिका, गीत व विविध कलाप्रकारांनी वातावरण रंगतदार झाले होते. कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि कार्यक्रमाने गर्दीचा उच्चांक गाठला.या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी मेथे पाटील मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजय अनुसे सर यांनी व्यक्त केले. एकूणच, विद्या मंदिर शिरोली नं. 3 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, शिस्त आणि दर्जेदार सादरीकरणामुळे सर्वांच्या स्मरणात राहील, असे यशस्वीपणे पार पडले.