शिरोळमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त भंडारखाना भक्तिमय वातावरणात संपन्न

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील रहिमतपूरकर माने समाजाचे कुलदैवत असलेल्या मंगसुळीच्या खंडोबा देवाची वार्षिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. या पार्श्वभूमीवर श्री म्हाळसाकांत मंडळ, शिरोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारखान्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिरोळ शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.मंगसुळी देवस्थान येथे माने समाजाला सासनकाठीचा मान आहे.ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे पाळली जात असून समाजाच्या धार्मिक ओळखीचा महत्त्वाचा भाग मानली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेपूर्वी श्री म्हाळसाकांत मंडळातून सासनकाठी विधीवत मंगसुळी येथे नेण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि पारंपरिक विधींनी हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.यात्रा संपन्न झाल्यानंतर भंडारखान्याचे आयोजन करण्याची परंपरा देखील मंडळाने कायम ठेवली आहे.या भंडारखान्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत प्रसाद ग्रहण केला.सर्वत्र भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.या धार्मिक उपक्रमामुळे समाजातील ऐक्य,परंपरा आणि श्रद्धा अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.उपस्थित भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेऊन व प्रसाद घेऊन समाधान व्यक्त केले.संपूर्ण परिसर ‘यळकोट,येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!