सारथी शिष्यवृत्ती योजनेत नम्रता पाटीलची निवड; यशोदीप अकॅडमीतर्फे गौरव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

जिद्द,परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कु.नम्रता राजेंद्र पाटील हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था) यांच्या शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेत तिची निवड झाली असून,यामुळे तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला भक्कम आधार मिळाला आहे. मराठा, कुणबी-मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत योजना राबवल्या जातात. UPSC, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे यासाठी विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.या योजनेसाठी घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत नम्रता हिने यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.या निवडीमुळे नम्रता हिला वर्षभरासाठी दरमहा १३,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.तसेच अभ्यासासाठी आवश्यक असलेले टॅबलेट आणि इतर शैक्षणिक साधने देखील तिला देण्यात आली आहेत.या सुविधांमुळे तिच्या स्पर्धा परीक्षा तयारीला मोठी चालना मिळणार आहे.नम्रता पाटील हिच्या या यशाबद्दल यशोदीप अकॅडमीतर्फे तिचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी अकॅडमीचे मार्गदर्शक राजेंद्र काळे, अमोल गावडे आणि कृष्णा गावडे यांनी तिचे अभिनंदन करत पुढील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.नियमित अभ्यास, चिकाटी आणि योग्य दिशा यामुळेच असे यश मिळते,असे मत त्यांनी व्यक्त केले.नम्रता हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि यशोदीप अकॅडमीच्या मार्गदर्शकांना दिले.तिच्या या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.नम्रता पाटील हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,भविष्यात ती आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!