शिरढोण / प्रतिनिधी
शिरढोण येथे गुरुवारी दि.२ एप्रिल रात्री साडे आठच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. स्वाद हॉटेलजवळून दुचाकीवरून जात असताना अचानक झाड कोसळून विजय कोपार्डे (रा.शहापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित कामातील निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.प्राप्त माहितीनुसार,कोपार्डे हे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जात असताना रस्त्यालगत असलेले झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळले.या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व अविनाश पाटील यांनी तत्परता दाखवत जखमीला तात्काळ रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलवले.त्यांच्या प्रसंगावधानामुळे पुढील संभाव्य धोका टळला आणि उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले.दरम्यान, या परिसरात इचलकरंजी महानगरपालिकेच्या कृष्णा योजनेअंतर्गत पाइपलाईनचे काम सुरू आहे.रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येत असून झाडांच्या मुळांना गंभीर इजा पोहोचत आहे. त्यामुळे अनेक झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत.नागरिकांनी यापूर्वीही संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्या होत्या,मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासन व ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तातडीने पाइपलाईनचे काम सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून पूर्ण करावे,अन्यथा काम त्वरित बंद करावे,अशी जोरदार मागणी होत आहे.अन्यथा अशा घटना पुन्हा घडल्यास जबाबदार कोण,असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.