शिरोळ / प्रतिनिधी
“नात्यात रमावसं वाटतं… पण रक्ताच्या नात्यांनीच पाठ फिरवली, तर मन कुठे जावं?” हा प्रश्न आहे निमशिरगाव येथील ‘आई’ वृद्धाश्रमात राहणाऱ्या त्या मातांचा, ज्यांनी आयुष्यभर संसारासाठी कष्ट केले, मुलांना वाढवलं, संस्कार दिले…पण उतारवयात मात्र एकटेपणाची शिक्षा भोगावी लागते आहे. डोळ्यांत अश्रू, ओठांवर हलकंसं हसू आणि मनात दडलेलं अथांग दुःख… अशा अवस्थेत या मातांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. “आम्हालाही मुलं, नातवंडं खूप आठवतात. सणासुदीला तर मन अजूनच व्याकुळ होतं.पण घरच्यांना आमची आठवणही येत नाही… मग आम्ही करावं तरी काय?” या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले.निमशिरगाव येथील ‘आई’ वृद्धाश्रमात मंगळवारी “निमित्त वाढदिवसाचे – प्रबोधन समाज मनाचे” या संकल्पनेतून “आयुष्याची संध्याकाळ” हा हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते डॉ.दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.या उपक्रमाचे आयोजन शिरोळ तालुका लोककलाकार संघटना व श्री संत रोहिदास सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात साध्या पण भावपूर्ण वातावरणात झाली. वृद्धाश्रमातील मातांनी पाहुण्यांचे स्वागत करताना आपल्या मनातील ओढ व्यक्त केली.काही मातांनी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर काहींनी शांतपणे आपले दुःख शब्दांत मांडले. “आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांना मोठं केलं.त्यांच्या संसाराला फुलवलं. पण आज आम्हाला त्यांच्या आयुष्यात जागा नाही,” असे सांगताना त्यांच्या आवाजात वेदना स्पष्ट जाणवत होत्या.या मातांच्या भावना ऐकताना उपस्थित प्रत्येकाचे मन द्रवले. समाजात वाढत चाललेली पिढीगत दरी आणि वृद्धांप्रती कमी होत चाललेली संवेदनशीलता याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना व्यक्त होत होती.याचवेळी काही मातांनी वृद्धाश्रमात मिळणाऱ्या सुविधा आणि प्रेमाबद्दल समाधानही व्यक्त केले. “इथे आम्हाला कोणी तरी ‘आई’ म्हणतं, विचारपूस करतं, औषधोपचार मिळतात, वेळेवर जेवण मिळतं. आम्ही इथे आनंदी आहोत… पण रक्ताच्या नात्यांची जागा कुणी घेऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि त्यांच्या परिवाराचा उल्लेख करताना मातांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना दिसून आली.त्यांनी आम्हाला आई म्हणून स्वीकारलं. मुलांसारखं सांभाळ करत आहेत. आम्हाला आधार दिला, म्हणून आज आम्ही उभे आहोत, असे त्या म्हणाल्या.कार्यक्रमात एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान यांनी आपल्या सादरीकरणातून वृद्धांच्या आयुष्यातील वास्तव जिवंत केलं.त्यांच्या अभिनयाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं. वेध फाउंडेशनच्या प्रमुख डॉ.रजनीताई शिंदे यांनीही वृद्ध माता-पित्यांशी संवाद साधत “आयुष्याची संध्याकाळ” या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी वृद्धांच्या मनातील वेदना समजून घेत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.या संवादातून नातीगोती, कौटुंबिक जिव्हाळा आणि समाजातील बदलत्या मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला. “वृद्धांना केवळ अन्न-वस्त्र नव्हे, तर प्रेम, सन्मान आणि सहवासाची गरज असते,” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.डॉ.दगडू माने यांनीही यावेळी वृद्धांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.“आपण एकटे नाही. समाज तुमच्या पाठीशी आहे,” असे सांगत त्यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. त्यांच्या शब्दांनी वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.कार्यक्रमानंतर कलाकार राजेंद्र प्रधान, कुणाल कांबळे, संजय भोसले आणि दिलीप उर्फ दिवाण कोळी यांनी गीतगायन सादर करून वातावरण प्रसन्न केले. या गाण्यांमुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि काही काळासाठी तरी त्यांच्या दुःखावर पडदा पडला.या कार्यक्रमास वेध फाउंडेशनचे राज्य सचिव मुरलीधर शिंदे, राज्य अध्यक्षा आशा वाघीरे, शुभम कांबळे, सचिन कमलाकर, श्रेयश माने, अक्षय कोठावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. गंगाराम सातपुते यांनी केले.दरम्यान, या उपक्रमातून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगांना समाजाभिमुख दिशा दिली, तर त्यातून अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण होऊ शकतात.कार्यक्रमाच्या शेवटी वृद्धाश्रमातील सर्व मातांनी डॉ. दगडू माने यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या क्षणी वातावरणात एक वेगळाच भावनिक रंग भरला होता – ज्यात प्रेम, कृतज्ञता आणि नात्यांची ओढ यांचा संगम दिसत होता.आजच्या वेगवान आणि स्वकेंद्रित जीवनशैलीत वृद्धांची उपेक्षा ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे.मुलांच्या यशासाठी आयुष्य घालवणारे आई-वडीलच जेव्हा त्यांच्या आयुष्यात ‘अनावश्यक’ ठरतात, तेव्हा समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. निमशिरगावच्या ‘आई’ वृद्धाश्रमातील हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नव्हता, तर तो समाजाला जागं करणारा एक आरसा होता. या आरशात आपल्याला आपलीच माणुसकी दिसते,कधी उजळलेली, तर कधी धूसर झालेली.“रक्ताच्या नात्यांची आस अजूनही संपलेली नाही,” असे सांगणाऱ्या या मातांच्या डोळ्यांत एकच अपेक्षा आहे.आपल्या माणसांनी एकदा तरी मागे वळून पाहावं…आणि कदाचित, त्या एका भेटीत त्यांचं संपूर्ण आयुष्य पुन्हा उजळून निघेल अशा भावनिक प्रतिक्रिया उमटल्या.