“निमित्त वाढदिवसाचे, प्रबोधन समाज मनाचे!” डॉ.दगडू माने यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी होणार साजरा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

कलाविश्व रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे समाजभूषण डॉ.दगडू श्रीपती माने यांचा वाढदिवस बुधवारी १ एप्रिल रोजी साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा होणार आहे.वाढदिवसानिमित्त “निमित्त वाढदिवसाचे, प्रबोधन समाज मनाचे!” या संकल्पनेतून मंगळवार (दि.३१) व बुधवार (दि. १) असे दोन दिवस विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक राजा प्रधान यांनी दिली.डॉ.माने यांनी सामाजिक, सांस्कृतिक चळवळींसोबतच पत्रकारिता क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे.समाजात एकता,सामाजिक सलोखा आणि संविधानात्मक विचार रुजविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवा पिढीमध्ये समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.या कार्यक्रमाचे आयोजन शिरोळ तालुका लोककलाकार संघटना आणि श्री संत रोहिदास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.मंगळवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता निमशिरगाव येथील वृद्धाश्रमात वृद्ध माता-पित्यांची भेट घेऊन “आयुष्याची संध्याकाळ” या विषयावर संवाद व चर्चा आयोजित करण्यात आली आहे.यावेळी एकपात्री नाट्यकलाकार राजा प्रधान तसेच वेध फाउंडेशनच्या प्रमुख रजनी शिंदे या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधणार आहेत.बुधवारी (दि.१) सकाळी १० वाजता शिरोळ येथील डॉ. माने यांच्या निवासस्थानी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच कलाकार कुणाल कांबळे यांच्या लोकप्रबोधनपर गीतगायन कार्यक्रमासाठी ५ हजार रुपयांचा निधी प्रदान करण्यात येणार आहे.या उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याची एक सकारात्मक व प्रेरणादायी परंपरा समाजात रुजत असल्याचे दिसून येत आहे.या कार्यक्रमांना सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून,डॉ.माने यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!