डब्बल महाराष्ट्र केसरी किताबावर पै.अमृता पुजारीची मोहोर; शिरोळात जल्लोष

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळच्या कुस्ती परंपरेला नवा मानाचा तुरा रोवणारी सुकन्या पै.अमृता शशिकांत पुजारी हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी करत “डब्बल महाराष्ट्र केसरी” हा बहुमानाचा किताब पटकावला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे शिरोळ शहरासह संपूर्ण परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अमृता पुजारी हिने यापूर्वीही महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब जिंकत आपली छाप उमटवली होती.यंदाच्या स्पर्धेत तिने दमदार आणि नेत्रदीपक खेळी सादर करत प्रतिस्पर्ध्यांना नमवले व पुन्हा एकदा आपल्या ताकदीची प्रचिती दिली. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि जिद्दीचा हा परिपाक असल्याचे क्रीडाप्रेमींनी नमूद केले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यावेळी शिरोळकर नागरिकांनी टीव्हीसमोर बसून सामन्याचा थरार अनुभवला.अमृताने विजय मिळवताच शहरात जल्लोष उसळला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण,तसेच साखर-पेढ्यांचे वाटप करून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान स्पष्ट दिसत होते.या यशानंतर शिरोळकरांनी अमृताच्या घरी भेट देत तिचे व कुटुंबियांचे अभिनंदन केले.वडील शशिकांत पुजारी,आई मनीषा पुजारी,आजोबा देवाप्पा पुजारी, चुलते बबन पुजारी आणि चुलती नगरसेविका सविता पुजारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कुटुंबीयांनीही अमृताच्या यशाचे श्रेय तिच्या कठोर सरावाला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले.कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अमृताच्या या यशाचे कौतुक करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिच्या या कामगिरीमुळे शिरोळचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून, नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.अमृता पुजारी हिच्या या दैदिप्यमान यशामुळे शिरोळमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,भविष्यात ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच कामगिरी करेल,असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!