पुलाची शिरोलीत रामनवमीचा उत्साह; भव्य शोभायात्रेने अवघं गाव झालं राममय!

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक दल आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पुलाची शिरोली येथे रामनवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उत्सवाच्या निमित्ताने सकाळी श्रीराम मंदिरात विधिवत अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दुपारी ठीक १२ वाजता रामजन्माचा सोहळा पार पडला. यावेळी महिलांनी पाळणा गाऊन आणि ओवाळणी करून श्रीरामाचे स्वागत केले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी यादववाडी येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे श्रीराम, विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, पवनपुत्र हनुमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाय वासरू यांच्या मूर्तींनी सजलेले रथ आकर्षणाचे केंद्र होते. तर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेतील युवक-युवतींनी इतिहासाची आठवण करून दिली.ढोल, ताशा आणि झांज पथकाच्या तालावर निघालेल्या या यात्रेत युवकांनी मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. शोभायात्रा गावातील मुख्य मार्गावरून फिरत असताना ठिकठिकाणी फुलांची उधळण आणि आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, गावातील सर्व समाजघटकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले होते. शोभायात्रेची सांगता माळवाडी येथील आंबेडकर चौक येथे करण्यात आली. या संपूर्ण सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पुढील वर्षीही अशाच प्रकारे अधिक उत्साहात आणि एकजुटीने उत्सव साजरा करू, असा निर्धार विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!