आदर्श मातृत्वाचा गौरव : श्रीमती सुगंधा माने यांना ‘आदर्श माता पुरस्कार’

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत शिरोळ येथील ९२ वर्षीय श्रीमती सुगंधा रामचंद्र माने यांना ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा सन्मान करण्यात आला.सांगली येथे ज्येष्ठ कलाकार राजा प्रधान यांच्या एकपात्री लोकनाट्य प्रयोगाच्या शुभारंभ प्रसंगी हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.मात्र वयोमानामुळे श्रीमती माने कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी अत्यंत आपुलकीच्या वातावरणात त्यांना कोल्हापुरी फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.श्रीमती सुगंधा माने यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. प्रारंभीच्या काळात अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जात त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. माने कुटुंबातील एकत्र कुटुंब पद्धती टिकवून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्याग, संयम आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी कुटुंब एकत्र ठेवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या जीवनमूल्यांची आणि आदर्श मातृत्वाची दखल घेत संस्थेने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले.या कार्यक्रमात निवृत्त प्राचार्य आप्पासाहेब पुजारी व ह.भ.प. रामचंद्र पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कलाविश्व रंगभूमीचे डॉ. दगडू माने यांनी उपस्थितांचे स्वागत करत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी अशा प्रेरणादायी व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.यावेळी अण्णासाहेब पुजारी व ‘शिरोळ भूषण’ दिलीपराव माने यांनीही मनोगत व्यक्त करत श्रीमती माने यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या आयुष्याचा आदर्श नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान, उदय संकपाळ, दिलीप उर्फ दिवाण कोळी, श्रेयश माने, अभिजीत माने, जे. के. कांबळे, वैभव माने, राजेंद्र दाभाडे, तानाजी जाधव, बाळासाहेब माने, रावसाहेब माने, भाऊसाहेब माने, शामराव माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सन्मान सोहळ्यामुळे श्रीमती सुगंधा माने यांच्या आयुष्यभराच्या कष्टांना आणि मातृत्वाच्या महानतेला योग्य तो सन्मान मिळाला असून,समाजात आदर्श मूल्यांची जपणूक करण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!