पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
वीस वर्षांपूर्वी श्रीपती बुडकर यांनी सुरू केलाला दूध विक्री व्यवसाय सध्या रणजीत सांभाळत होता. सन २०२१ मध्ये देशात आणि जगात कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता.नात्या गोत्यातील माणसं एकमेकांच्या जवळ येत नव्हती.अशावेळी रणजीत बुडकर हे गोकुळ दूध दररोज पहाटे उठून पुलाची शिरोलीसह औद्योगिक वसाहतीत ग्राहकांना व हाॅटेल व्यावसायिकांना आपल्या जीवाची पर्वा न करता अखंडित दूध पुरवठा करुन कधीच कमी पडू दिले नाही.तसेच तो सामाजिक,क्रिडा, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होता.अशा या कष्टाळू तरुणाचा शुक्रवारी सकाळी दूध विक्री करीत असताना आकस्मिक मृत्यू झाला. आणि क्षणार्धात त्याच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला.शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास रणजीत हा शिरोली औद्योगिक वसाहतीतील श्रीराम फौंन्ड्री चौकात नेहमीप्रमाणे हाॅटेलमध्ये दूध देत असताना अचानक रस्त्यावर कोसळला. त्याला तेथील हॉटेल मालकाने स्वताच्या गाडीतून तत्काळ शिरोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.या त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे.