पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
गुरुवारी मध्यरात्री पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत टोप हद्दीत शिरोली औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेशेजारी असणारे सहा दुकान गाळे फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत टोप हद्दीत आयडीबीआय बॅंकेशेजारी दिनेश मिश्रा यांच्या मालकीचे लक्ष्मी टी स्टॉल,हेमंत मोरे यांच्या मालकीचे विनय कोचिंग वर्क्स, अमर तराळ यांच्या मालकीचे किसान रोडवेज,राहुल लोहार यांच्या मालकीचे विश्वकर्मा मोटार गॅरेज,जमाल येळापुरे यांच्या मालकीचे महाराष्ट्र बॉडी गॅरेज असे एकूण सहा गाळे आहेत.हे गाळे अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.लक्ष्मी टी स्टॉल चा दरवाजा उचकटला आहे.विनय कोचिंग वर्क्स चे मटेरियल चोरीला गेले आहे.किसान रोडवेज चा दरवाजा फोडून तसेच विश्वकर्मा गॅरेज मधील कडी शटर उचकटून किरकोळ मटेरियल चोरून नेले आहे.महाराष्ट्र बॉडी गॅरेज मध्ये नटबोल्ट मशीन,वेल्डिंग मशिनची कॉपर केबल, तसेच सीसीटीव्ही चे डिव्हीआर मशीन चोरून नेले आहे.तसेच याठिकाणी उभ्या असणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या गाडीमधील दोन ॲल्युमिनियम मटेरियलच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत. असा एकूण सहा गाळ्यामधील सुमारे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.सकाळी हे सर्व व्यावसायिक व्यवसायाच्या ठिकाणी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.अगदी महामार्गालगत सलग सहा गाळे चोरट्यांनी एका रात्रीत फोडून पोलिसांना आव्हाहन दिले आहे. या घटनेमुळे परिसरातील गाळे धारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.