टाकळीवाडीच्या कन्येचा सांगलीत सन्मान; कर्तव्यदक्ष सेवेमुळे कविता निर्मळे यांचा गौरव

Spread the love

टाकळीवाडी / प्रतिनिधी 

येथील कन्या कविता पुंडलिक निर्मळे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या जोरावर पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करत सांगलीत सन्मान मिळवला आहे.सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कविता निर्मळे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या सन्मानामुळे त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण टाकळीवाडी गावाचा अभिमान उंचावला आहे.कविता निर्मळे सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात ‘कोर्ट पैरवी अंमलदार’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जबाबदारीत पोलीस तपासातील तांत्रिक बाबींची अचूक हाताळणी, न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची प्रभावी मांडणी, तसेच गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे आणि कागदपत्रांची वेळेत पूर्तता करणे यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कामात सातत्याने दाखवलेली काटेकोरता आणि दक्षता यामुळे अनेक प्रकरणे यशस्वीरित्या मार्गी लागली आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. सांगली पोलीस दलाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक करत, “खाकी वर्दीतील शिस्त, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळेच यशाची शिखरे गाठता येतात,” असे प्रतिपादन केले.कविता निर्मळे यांच्या या यशामुळे त्यांच्या मूळ गावी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील एका मुलीने पोलीस दलात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत मिळवलेला हा सन्मान इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावातील महिला वर्ग, युवक आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आपल्या कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकता ठेवली तर त्याचे योग्य वेळी कौतुक होते, हे कविता निर्मळे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.त्यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!